ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गडचिरोली : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात ६ तस्कर अडकले, वाघांच्या अवयवासह २ खवले मांजर जप्त

गडचिरोली : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात ६ तस्कर अडकले; वाघांच्या अवयवासह २ खवले मांजर जप्त

आलापल्ली : वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची अवैध विक्री करणाऱ्या तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री रचलेल्या विशेष सापळ्यात सहा तस्करांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वाघाचे ४२ हाडे, दोन दात आणि दोन जिवंत खवले मांजर जप्त करण्यात आले.
वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गोपनीय माहिती संबंधित तपास यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून तस्करांशी संपर्क साधला. अवयव खरेदी करण्याचे भासवत व्यवहाराची बोलणी करण्यात आली आणि तस्करांना आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर निश्चित ठिकाणी बोलावण्यात आले.
शनिवारी रात्री सुमारे ८ वाजता तीन दुचाकींवरून सहा जण तेथे पोहोचले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने तस्करांना चौफेर घेरून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील साहित्याची तपासणी केली असता वाघाचे विविध अवयव आणि दोन जिवंत खवले मांजर आढळून आले.
या कारवाईत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प या तीन यंत्रणांनी समन्वयाने सहभाग घेतला. कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविण्यात आली.
अटक केलेल्या सहा आरोपींची रविवारी वैद्यकीय तपासणी करून त्यांना अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना १ ऑक्टोबरपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आलापल्ली वन विभागाच्या परिसरात मागील काही महिन्यांत वन्यजीव शिकारीच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आरोपींचा यापूर्वीच्या शिकारीच्या घटनांशी संबंध आहे का, त्यांनी आणखी किती वन्यप्राण्यांची शिकार केली आणि या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. सखोल चौकशीनंतर वन्यजीव तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.