ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नालीतील गाळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा; सिरोंचा नगरपंचायतीच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक

नालीतील गाळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा; सिरोंचा नगरपंचायतीच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक

सिरोंचा : शहरातील ज्या-ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये माती व गाळ साचून पाण्याच्या प्रवाहाची समस्या निर्माण होते, त्या ठिकाणी सिरोंचा नगरपंचायतीकडून नियमितपणे नाल्यांमधील माती काढण्याचे काम करण्यात येत आहे.

 

वॉर्ड क्रमांक १७ मधील नाल्यांमधून काढण्यात आलेली माती हटवून इतर ठिकाणी नेण्यात आली असून, सध्या शहरातील इतर वॉर्डांमधील नाल्यांमधील माती व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नाल्यांमधील अडथळे दूर केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होत असून, पाणी एका ठिकाणी साचण्याची शक्यता कमी होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत होणार आहे.

 

नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतेचे काम करून घेत आहेत. या कामात नगरपंचायतीचे कर्मचारी राजू भाऊ व किशन भाऊ प्रत्यक्ष मेहनत घेत असून, प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नाल्यांमधील माती व गाळ काढण्याचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.

 

विशेष म्हणजे, नाल्यांमधून काढण्यात आलेली माती अनावश्यक ठिकाणी न टाकता गरज असलेल्या ठिकाणी नेऊन तिचा सदुपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे स्वच्छतेसोबतच काढलेल्या मातीचा योग्य वापर करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न दिसून येत आहे.

 

नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी वेळोवेळी करण्यात येणाऱ्या या कामामुळे सिरोंचा शहरातील स्वच्छता आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारण्यास मदत होत असून, नगरपंचायतीच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

G K