ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली!पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

*मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली! पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

*मुलचेरा :* मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पारंपरिक तालुका ग्रामसभा, मुलचेरा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला.

मुलचेरा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी एकजूट दाखवत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद केला.

यंदाच्या परिस्थितीचा विचार करता तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. रॅलीनंतर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

शासनाने मुलचेरा तालुक्यातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक त्या सवलती आणि आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

या रॅलीदरम्यान ग्रामसभा अध्यक्ष दिलीप आत्राम, केसरी तेलामी, सुभाष आत्राम, गणेश गारघाटे, मारोती पल्लो, उमाकांत आत्राम, गणपत मडावी, सौ. साधना मडावी, सौ. सुनीता कुसनाके, प्रमोद गोटेवार, काशिनाथ कन्नाके, सत्यवान सिडाम, शंकर मोहंदा यांच्यासह ग्रामसभा सदस्य, शेतकरी, शेतमजूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.