आरमोरी

देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे ‘छात्रों की गुंज – शिक्षा बचाओ, देश बचाओ’ या विद्यार्थी जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, विद्यार्थ्यांचे हक्क, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातूनच देशाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे सांगितले. संविधानाने दिलेल्या समान संधी, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम समाज घडविण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेले मार्गदर्शन चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. या चित्रफितीतून विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील सध्याची परिस्थिती, बदलती शैक्षणिक धोरणे, रोजगाराच्या संधी, स्पर्धात्मक युगातील आव्हाने आणि देशाच्या भविष्यात युवकांचे योगदान याबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांनी ही चित्रफीत मोठ्या उत्सुकतेने पाहत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बदलत्या शैक्षणिक धोरणांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षण, करिअर आणि रोजगारावर होणारा परिणाम, उच्च शिक्षणातील वाढते आव्हान, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज तसेच सामाजिक आणि संविधानिक जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न उपस्थित करत शिक्षण व्यवस्थेतील अडचणी, रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुधारणांबाबत आपली मते मांडली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक माणिक भोयर, नगरसेविका मेघाताई मने, नगरसेवक अक्षय बागडे, ज्येष्ठ नेते शालिक पत्रे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, NSUI महाराष्ट्र प्रदेशचे सचिव निशांत वनमाळी, श्रीनिवास आंबटवार, वैभव गोलाईत, पवन भोयर, विजय सुपारे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रश्नांवर जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी सकारात्मक पद्धतीने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे, संविधानिक मूल्यांची जपणूक करणे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.




