सरमळे भीमनगर येथील ओहोळावर वनराई बंधारा घालण्यासाठी गावातील सर्व महिला बचतगटांच्या सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी श्रमदान केले. या उपक्रमाला सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे आणि पोलीस पाटील दीपक नाईक यांचे सहकार्य लाभले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या पुढाकारातून विविध ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमध्ये लोकसहभागातून श्रमदानाला विशेष महत्त्व दिले जात असून, वनराई बंधाऱ्यांची उभारणी हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे.
वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढून भूजल पातळी सुधारण्यास हातभार लागतो. तसेच विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकविणे शक्य होते.
लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या अशा जलसंधारण उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होत असून, जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक होण्यास मदत होत आहे.


