ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोयनगुड्यातील पाणीपुरवठा आणि पुलियाचा गंभीर प्रश्न राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी; अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत समस्यांच्या पाठपुराव्याची ग्वाही.

कोयनगुड्यातील पाणीपुरवठा आणि पुलियाचा गंभीर प्रश्न राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी; अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत समस्यांच्या पाठपुराव्याची ग्वाही.

*पाईपलाईन फुटल्याने महिलांची पाण्यासाठी कसरत; पावसाळ्यात पुलिया पाण्याखाली जात असल्याने भामरागड मुख्यालयाशी संपर्क तुटतो, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा.*

 

 

*भामरागड:-* भामरागड नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोयनगुडा गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि पावसाळ्यात भामरागड मुख्यालयाशी संपर्क तोडणाऱ्या पुलियाचा गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी महाराजांनी दोन्ही समस्यांची गांभीर्याने दखल घेत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तर पुलियाच्या प्रश्नासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

 

कोयनगुडा गावातील पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून गावात नियमित पाणी पोहोचत नाही. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांची ही अडचण समजताच राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मुख्याधिकारी अभिजित सोनवणे नगरपंचायत भामरागड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून गावातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा आणि नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

याचवेळी ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या पुलियाचा आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. ही पुलिया कोयनगुडा गावाला भामरागड मुख्यालयाशी जोडणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढून पुलिया पाण्याखाली जात असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होते. त्यामुळे गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. रुग्णांना उपचारासाठी नेणे, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच इतर दैनंदिन कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दरवर्षी उद्भवत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

 

ग्रामस्थांनी मांडलेल्या या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी पुलियाच्या समस्येवरही संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटू नये आणि नागरिकांना सुरक्षित दळणवळणाची सुविधा मिळावी, यासाठी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

प्रसंगी युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,अर्जुन आलम भाजपा तालुका अध्यक्ष भामरागड,तपेश हलदार नगर उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड यांच्यासह पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.