ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिन सोहळ्यात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती.

गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिन सोहळ्यात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी अस्मितेचा जागर

गडचिरोली:- आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी, जल-जंगल-जमीन आणि हक्कांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवणारे महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थिती दर्शविली.

 

भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करत आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि संघर्षमय इतिहासाचा जागर यावेळी करण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज या सोहळ्याच्या माध्यमातून अधोरेखित झाली.

 

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांनी ऑनलाइन उपस्थित होते.

 

तसेच केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार मायाताई इवनाते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, केंद्रीय आदिवासी कार्य सचिव रंजना चोपडा, राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, माजी खासदार अशोक नेते यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा आणि स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रेरणादायी इतिहास आहे. जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करत आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान करण्यात आला.