आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आवाहन; पारंपरिक दसरा उत्सवात समाजाच्या एकजुटीचे घडले दर्शन*
*📍पेरमिली:-* शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या अहेरी इस्टेटच्या दसरा महोत्सवाचे आदिवासी समाजात विशेष महत्त्व आहे. अहेरी येथे ऐतिहासिक दसरा उत्सव पार पडल्यानंतर तेथील पवित्र ज्योत अहेरी इस्टेटमधील विविध आदिवासी पट्ट्यांमध्ये नेऊन पारंपरिक पद्धतीने दसरा उत्सव साजरा करण्याची प्राचीन परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. याच परंपरेनुसार अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी पारंपरिक दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील तब्बल ५० गावांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते पवित्र ज्योतीचे विधिवत पूजन करून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी मंचावर युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, योगेश तपकीर पो.ऊ.नि.पेरिमिली, डॉ.अमोल कुकडकर आ.ऊ. के.पेरिमिली,बोडाजी गावडे,संजय सडमेक गडी शेंड्या,बालाजी गावडे अध्यक्ष,प्रमोद आत्राम उपाध्यक्ष,बंडू तलांडे, संदीप गावडे,निलेश वेलादी माजी उपसरपंच,अमरनाथ गावडे,विजय आत्राम,सौ.कल्पना तलांडी,लक्ष्मण कुळमेथे,वारलू तलांडे, राजू आत्राम माजी उपसरपंच, किरण कोरेत,सौ.सध्या मडावी आणि तसेच परिसरातील भूमिया, गाव पाटील, पारंपरिक पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेप्रती आदिवासी समाजाची असलेली श्रद्धा आणि सांस्कृतिक नाते या उत्सवातून प्रकर्षाने दिसून आले.
यानंतर उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित करताना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आदिवासी समाज हा या देशाचा मूळ निवासी असून जल, जंगल आणि जमीन यांच्याशी त्याचे अतूट नाते आहे. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून जपलेल्या रूढी, परंपरा, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक वारसा हीच आपल्या समाजाची खरी ओळख आहे. काळ बदलत असला आणि आधुनिकतेचा स्वीकार करत असलो तरी आपल्या संस्कृतीचा विसर पडता कामा नये. हा अनमोल वारसा पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. पारंपरिक सण आणि उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून समाजाला एकत्र आणणारे, बंधुभाव वाढविणारे आणि सांस्कृतिक अस्मिता जिवंत ठेवणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. समाजातील एकोपा टिकवून ठेवत शिक्षण, सामाजिक विकास आणि आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणेही तितकेच आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या उत्सवादरम्यान पारंपरिक आदिवासी नृत्य, गीतगायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्साहमय झाले. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक सादरीकरणातून आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडले. पेरमिली पट्टीतील शेंड्या, गाव पाटील, भूमिया यांच्यासह परिसरातील ५० गावांतील आदिवासी बांधवांच्या सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत आली.
अहेरीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवातून प्रज्वलित झालेली पवित्र ज्योत पेरमिलीसारख्या आदिवासी पट्ट्यांमध्ये पोहोचवून शेकडो वर्षांची परंपरा आजही जिवंत ठेवली जात आहे. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झालेल्या विधिवत पूजनाने आणि त्यांच्या मार्गदर्शनपर संबोधनाने या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. परंपरेचा अभिमान, संस्कृतीचे जतन आणि समाजाची एकजूट असा संदेश देणारा पेरमिलीचा पारंपरिक दसरा उत्सव उत्साहात पार पडला.





