महाराष्ट्र

बिसलेरीच्या पाण्याबाबत मोठे स्पष्टीकरण! केवळ ‘गो २७०’च्या एका बॅचच्या विक्रीवर निर्बंध; देशभरातील अन्य उत्पादनांना बंदी नाही

बिसलेरीच्या पाण्याबाबत मोठे स्पष्टीकरण! केवळ ‘गो २७०’च्या एका बॅचच्या विक्रीवर निर्बंध; देशभरातील अन्य उत्पादनांना बंदी नाही

FSSAI च्या स्पष्टीकरणाचे बिसलेरीकडून स्वागत; १४ महिन्यांपूर्वी तयार केलेल्या विशिष्ट बॅचपुरतीच कारवाई मर्यादित

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर : बिसलेरी कंपनीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता महत्त्वाचे स्पष्टीकरण मिळाले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या स्पष्टीकरणाचे बिसलेरी कंपनीने स्वागत केले आहे. ‘गो २७०’ या उत्पादनाच्या केवळ एका विशिष्ट बॅचच्या विक्रीवर निर्बंध लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील बिसलेरी प्रकल्पात तयार झालेल्या पाण्याच्या एका नमुन्याबाबत एफएसएसएआयकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे सुमारे १४ महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट बॅचशी संबंधित आहे.

या कारवाईचा संबंध बिसलेरीच्या देशभरातील अन्य उत्पादनांशी नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण बिसलेरी ब्रँडच्या पाण्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली नसून, निर्बंध केवळ संबंधित ‘गो २७०’ बॅचपुरते मर्यादित आहेत.

दरम्यान, अन्न व पाणी उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित बॅचची माहिती आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाचे : पाण्याच्या बाटलीवरील बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि इतर तपशील तपासूनच खरेदी करावी.

 

header