महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या बसफेऱ्या आता विनावाहक! २७ नोव्हेंबरपासून नवीन निर्णय लागू

विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या बसफेऱ्या आता विनावाहक! २७ नोव्हेंबरपासून नवीन निर्णय लागू

चालक-कम-वाहक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित, एसटी कर्मचारी संघटनांचा निर्णयाला विरोध

छत्रपती संभाजीनगर : शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २७ नोव्हेंबर २०२६ पासून शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या काही एसटी बसफेऱ्या विनावाहक चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयानुसार चालक-कम-वाहक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाणार आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून एसटी कर्मचारी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे.

नेमका काय आहे एसटीचा निर्णय?

छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रकांनी २३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात आदेश जारी केले. त्यानुसार २७ नोव्हेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या नियोजित बसफेऱ्या विनावाहक चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सेवेसाठी चालक-कम-वाहकांची नियुक्ती करण्यात येणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना ईटीआय तिकीट मशीन देण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ३ आणि १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समधील निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शालेय बसफेऱ्यांमध्ये लहान मुलांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवास करतात. अशा परिस्थितीत स्वतंत्र वाहक नसल्यास विद्यार्थ्यांच्या चढण्या-उतरण्यावर लक्ष ठेवणे, तिकीट देणे आणि वाहन चालविणे या जबाबदाऱ्या एकाच कर्मचाऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

एसटी कर्मचारी संघटनांचा निर्णयाला विरोध

एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सोळुंके यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. चालकांवर दुहेरी जबाबदारी टाकल्यामुळे कामाचा ताण वाढेल. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि प्रवासी सेवेचा दर्जा यावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईची भीती

गर्दीमुळे तिकीट देण्यास विलंब झाल्यास किंवा विनातिकीट प्रवासी आढळल्यास चालक-कम-वाहक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरचा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवास सुविधा देण्याचे आव्हान, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण, यामुळे महामंडळाच्या या निर्णयाकडे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी संघटनांचे लक्ष लागले आहे. 

header