MPSC तलाठी भरती २०२६ : ५,७०७ पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर!
तलाठी पदाच्या १,५३९ जागांचा समावेश; पूर्व परीक्षेत १०० गुणांची परीक्षा, चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुणांची कपात
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चा सविस्तर अभ्यासक्रम आणि गुणदान पद्धती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ५ हजार ७०७ रिक्त पदांचा समावेश असून, त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदाच्या १ हजार ५३९ जागा आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
तलाठी पदाच्या १,५३९ जागा
या भरतीमध्ये महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क संवर्गासाठी १,५३९ पदे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय लिपिक-टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कर सहायक, उद्योग निरीक्षक यांसह विविध संवर्गांतील पदांचाही समावेश आहे.
कशी असेल परीक्षेची पद्धत?
एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी देण्यात येणार असून प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. परीक्षेचा दर्जा पदवी स्तराचा राहणार आहे.
मुख्य परीक्षा इतर संवर्गांसाठी एकूण ४०० गुणांची (दोन पेपर) असेल. तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी ३०० गुणांची स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.
चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणदान
परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांपैकी २५ टक्के म्हणजेच १/४ गुण वजा केले जाणार आहेत. एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास किंवा उत्तरपत्रिकेतील वर्तुळ अपूर्ण भरल्यास ते उत्तर चुकीचे मानले जाईल. मात्र, प्रश्न अनुत्तरित सोडल्यास कोणतेही नकारात्मक गुण वजा केले जाणार नाहीत.
परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम
पूर्व परीक्षेतील सामान्य क्षमता चाचणीमध्ये एकूण आठ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
१. इतिहास : आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
२. भूगोल : भारत व महाराष्ट्राचा भूगोल, हवामान, नद्या, पर्जन्यमान, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, शहरे व उद्योगधंदे.
३. अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, बँकिंग, परकीय व्यापार, बेरोजगारी, अर्थसंकल्प व लेखापरीक्षण.
४. चालू घडामोडी : महाराष्ट्र, भारत आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी.
५. राज्यशास्त्र : भारताची व महाराष्ट्राची प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था.
६. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र.
७. अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी.
८. बुद्धिमापन चाचणी : तार्किक विचारशक्ती, आकलन आणि जलद निर्णयक्षमता तपासणारे प्रश्न.
उमेदवारांसाठी महत्त्वाचे आवाहन
तलाठी भरतीसह विविध गट-क पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी जाहीर झालेल्या अभ्यासक्रमानुसार नियोजनबद्ध अभ्यास करावा. विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयांचा नियमित सराव करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टीप : भरतीसंबंधी अंतिम व अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत अधिसूचना आणि संकेतस्थळ तपासावे.





