कृषी व जलसंपदा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक
गडचिरोली, दि.०९ : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीतील एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे कृषी व जलसंपदा क्षेत्रातील कामगिरीतही गडचिरोलीने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनासह या प्रयत्नांत सहभागी सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे.
आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास तसेच मूलभूत पायाभूत सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांतील ४८ निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्यांची कामगिरी मोजली जाते. निर्धारित कालावधीत या निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे डेल्टा रँकिंग निश्चित केले जाते.
एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत गडचिरोलीने सर्वाधिक सुधारणा नोंदवत देशात पहिला क्रमांक, तर जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळविला. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोलीने उल्लेखनीय प्रगती करत देशात प्रथम स्थान मिळविले आहे.
जिल्ह्यातील विविध विभागांनी समन्वयाने केलेल्या प्रयत्नांचा या यशात मोठा वाटा आहे. राज्य शासनाची जिल्हास्तरीय यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी एकत्रितपणे काम करत विकासाच्या विविध निर्देशांकांमध्ये सुधारणा घडवून आणली.
या सांघिक प्रयत्नांचे कौतुक करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी हे यश पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विकासातील तफावत कमी करणे, तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि सर्वसमावेशक व शाश्वत विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी नीती आयोगाने कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचे कौतुक केले आहे. गडचिरोलीच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासह सर्व संबंधितांचे अभिनंदन करत विकासाच्या पुढील टप्प्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





