गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात; पीक नुकसानभरपाईसह विविध सवलती देण्याची मागणी
The गडविश्व
मुलचेरा, दि. ०९ : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती संकटात सापडल्याने मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. मुलचेरा तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून, शेती व शेतीपूरक व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, चालू खरीप हंगामात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने पीक परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नकाशे पहा

पीक परिस्थितीची तातडीने पाहणी करा

तालुक्यातील पर्जन्यमान, पेरणी क्षेत्र, पीक नुकसान, उपलब्ध पाणीसाठा, भूजलपातळी आणि पीक उत्पादकता या निकषांच्या आधारे शासनाच्या संबंधित यंत्रणांनी तातडीने वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत. त्यानंतर मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, कृषी निविष्ठांसाठी आर्थिक मदत, महसूल सवलती आणि वीजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय, पीक कर्ज व इतर कृषी कर्जांबाबत शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना द्यावा. कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
शासनाने मुलचेरा तालुक्यातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी जगन्नाथ आत्राम, रविन मंडल, साईनाथ उरेते, दामा कडते, सुधाकर घोडाम, मिथुन कुळमेथे, अरुण कन्नाके, बालाजी सिडाम, भैय्याजी नैताम, अनिल गावडे, आनंदराव आत्राम, भास्कर सेडमाके, सुरेश कुळमेथे, रविंद्र तोरे, भास्कर राऊत, भास्कर मडावी, मंगामी आलाम, शंकर मडावी, शिवराम कुसनाके, रामदास कठबाळे आणि किशन कुमरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.