सिरोंचा:
तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपारिक ‘बथुकम्मा’ (गौरी पूजा) उत्सवाला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. या संपूर्ण परिसरात तेलंगणा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये या सवाबाबत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव महिलांचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाप्रती असलेली त्यांची अपार श्रद्धा यांचे दर्शन घडवतो.
या उत्सवाचे औचित्य साधून येत्या १४ ऑक्टोबर रोजी नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या वतीने एका विशेष भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात तेलंगणातील प्रसिद्ध गायिका मधुप्रीया सायंकाळी ५ वाजल्यापासून आपल्या सुश्राव्य गीतांची प्रस्तुती करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे यंदा या कार्यक्रमाबाबत संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नऊ दिवस चालणारा निसर्गरम्य उत्सव
बथुकम्मा हा प्रामुख्याने महिलांचा पारंपारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. निसर्ग, विविध प्रकारची फुले आणि गौरी मातेच्या पूजेला समर्पित असलेला हा उत्सव एकूण नऊ दिवस चालतो. या नऊ दिवसांत महिला विविध रंगांच्या नैसर्गिक फुलांचे एकावर एक आकर्षक थर रचून शंकूच्या आकाराची सुंदर ‘बथुकम्मा’ तयार करतात. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या महिला या बथुकम्माभोवती गोलाकार उभ्या राहून, टाळ्यांच्या तालावर पारंपरिक लोकगीते गातात आणि नृत्य करत आनंद साजरा करतात.
या विशेष सांस्कृतिक सोहळ्याला सिरोंचा शहरासह संपूर्ण परिसरातील नागरिक, महिला भगिनी आणि बथुकम्मा उत्सवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी केले आहे.




