उजनी धरणावरील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या विरोधात रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन सुमारे चार तास सुरू होते. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार संजय शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार प्रतापसिंह पाटील उपस्थित होते.
‘पाणी आणि वीज वापरणारे प्रकल्प नकोत’
आंदोलनादरम्यान बोलताना रोहित पवार यांनी प्रस्तावित प्रकल्पांच्या पाणी आणि वीज वापराबाबत चिंता व्यक्त केली. उजनी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर संसाधनांचा वापर करणारे प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. सेमीकंडक्टरसारखे उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे प्रकल्प आणल्यास त्यांचे स्वागत केले जाईल; मात्र पाणी आणि विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे प्रकल्प स्थानिकांवर लादू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जगातील इतर ठिकाणी तसेच गुजरातमध्येही स्वीकारले गेले नाहीत, असे प्रकल्प उजनी परिसरात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने बाधित नागरिकांची लोकसुनावणी घ्यावी आणि स्थानिकांच्या मागण्या विचारात घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील दोन महिन्यांत लोकसुनावणी घेऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
ग्रीन हायड्रोजन आणि अणुऊर्जा प्रकल्पांबाबत संभ्रमाचा आरोप
दरम्यान, शासनाच्या एका प्रसिद्धिपत्रकात ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर हे दोन प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे नमूद असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सामंजस्य करारांमध्ये या प्रकल्पांचा उल्लेख असल्याने सरकारकडून परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याचा आक्षेप रोहित पवार यांनी घेतला. या प्रकरणात चुकीची माहिती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही टीका केली. स्थानिक प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याऐवजी हॉटेलमध्ये बसून कारभार चालवणाऱ्या आणि नागरिकांवर दबाव आणणाऱ्या पालकमंत्र्यांचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रकल्प रद्द न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार : धैर्यशील मोहिते पाटील
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही उजनी परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांना विरोध दर्शविला. स्थानिक जनतेच्या संमतीशिवाय हे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रकल्प रद्द केल्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत संबंधित ठिकाणी भूमिपूजन किंवा अन्य कार्यक्रम होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत प्रस्तावित प्रकल्पांबाबत नाराजी व्यक्त केली. सरकारच्या धोरणांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
सुमारे चार तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, उजनी धरणावरील प्रस्तावित प्रकल्पांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याने स्थानिक नागरिक आणि आंदोलकांची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.





