सिरोंचा :
बामणी सबस्टेशन येथील हाय पावर ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे शिरोंचा तालुक्यातील तब्बल ६० गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. ऐन पिकांच्या हंगामात वीज गायब झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची, धान आणि मका पिके करपू लागली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या रेंगुठा परिसरातील विविध गावांतील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसील आणि महावितरण कार्यालयावर धडक देत ‘आक्रोश मोर्चा’ काढला.
‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
माजी उपसभापती सत्यनारायण परपटलावार, मधुकर कोल्लुरी आणि संतोष चंदावार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात रेंगुठा, नरसिहापल्ली, कोटापल्ली, मोयाबिनपेठा, पिरमेडा, पर्सेवाडा, बोंड्या, बोगटागुडम, दर्शेवाडा, झेंडा, टेकडा, जाफराबाद, बोरमपल्ली यांसह अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विद्युत पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे” आणि “जय जवान, जय किसान” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.
दोन दिवसांत दुरुस्ती न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार राजू सिडाम आणि महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भरत बाल पांडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. “पावर ट्रान्सफॉर्मर तात्काळ दोन दिवसांत दुरुस्त करा किंवा बदलून द्या, अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शेतकऱ्यांनी या निवेदनातून दिला आहे.
महावितरणकडून तात्पुरती सोय आणि आश्वासन
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भरत बाल पांडे यांनी तात्काळ उपाययोजना जाहीर केल्या:
• रात्रीचा वीजपुरवठा: सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारसपल्ली सबस्टेशनवरून बामणी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी तात्पुरता वीजपुरवठा केला जात आहे.
• नवा ट्रान्सफॉर्मर: येत्या तीन दिवसांत कुरखेडा येथून हायपावर ट्रान्सफॉर्मर आणून तो बामणी सबस्टेशन येथे बसवला जाईल आणि शेतकऱ्यांची समस्या कायमची निकाली काढली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले असून, तीन दिवसांत काम न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे.





