ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

FSSAI परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्यव्यापी विशेष मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन

FSSAI परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

राज्यव्यापी विशेष मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुलचेरा, वृत्तसेवा : राज्यातील अन्न सुरक्षा विभागाने अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) परवाना तातडीने प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले असून, परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याने अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत अन्न उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वितरण व विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यवसायासाठी FSSAI नोंदणी किंवा परवाना आवश्यक आहे. ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने हे नियम बंधनकारक केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही परवान्याशिवाय अन्न व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याने विभागाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मोहिमेअंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, चहा स्टॉल, कॉफी शॉप, बेकरी, फूड ट्रक, ज्यूस सेंटर, कॅन्टीन, मेस, हॉस्टेल मेस, मिठाई दुकाने, आईस्क्रीम पार्लर, केटरिंग सेवा, फास्ट फूड सेंटर, किराणा दुकाने, सुपरमार्केट, फळ व भाजी विक्रेते, धान्य व अन्नधान्य व्यापारी, मांस व चिकन विक्रेते, मासे विक्रेते, पाणी बाटली व्यवसाय, मसाला उत्पादक, घरगुती खाद्यपदार्थ विक्रेते, अन्न प्रक्रिया उद्योग, अन्न साठवणूक गोदामे तसेच ऑनलाइन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवान्याविना व्यवसाय आढळल्यास दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड तसेच व्यवसाय बंद करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह तातडीने FSSAI परवाना मिळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न व्यवसायातील पारदर्शकता वाढविणे, ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परवाना प्राप्त झाल्यास व्यवसायाची विश्वासार्हता वाढते, तसेच भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यास मदत होते.