
केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेअंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या वतीने मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे १७ जून २०२६ रोजी एक दिवसीय “शेतकरी प्रशिक्षण, बियाणे वाटप व कृषी उपयोगी निविष्ठा वितरण” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वय अधिकारी व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक नगराळे, शास्त्रज्ञ डॉ. नारायण बोरकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, कृषी अधिकारी नारायण लोलमवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) आकाश लवटे, सहायक कृषी अधिकारी रवी मडावी व विनायक केकान यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे संचालन आकाश लवटे यांनी केले.
यावेळी डॉ. दिपक नगराळे यांनी अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेची माहिती देत कपाशी व धान पिकांतील प्रमुख कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, तसेच सघन व कमी अंतराच्या कापूस लागवड तंत्रज्ञानाद्वारे उत्पादनवाढीचे मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी “शेती वाचवा” अभियान, रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
तसेच डॉ. नारायण बोरकर यांनी आधुनिक कृषी अवजारे, त्यांचा वापर आणि देखभाल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान बोलेपल्ली येथील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना कमी अंतराच्या लागवड तंत्रज्ञानासाठी कपाशी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय निम तेल, तणनाशके, ताडपत्री, भाजीपाला बियाणे, झिंक व बोरॉनसारखी सूक्ष्म अन्नद्रव्य खते आणि इतर कृषी उपयोगी साहित्याचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहायक कृषी अधिकारी रवी मडावी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सुमारे ४० आदिवासी शेतकरी उपस्थित होते.
ठळक बाबी
अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण
कपाशी व धान पिकांतील कीड-रोग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
कपाशी बियाणे व कृषी निविष्ठांचे वितरण
सुमारे ४० आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग
केंद्र शासनाच्या विकास कृती आराखडा योजनेअंतर्गत उपक्रम आयोजित.





