मुलचेरा: राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य आता थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असून, त्यासाठी Life Certificate आणि Beneficiary Satyapan App (BSA) द्वारे ऑनलाइन पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुलचेरा तहसील प्रशासनाने तालुकाभर विशेष जनजागृती व पडताळणी मोहीम सुरू केली आहे.
तहसील कार्यालय, मुलचेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार शासन निर्णय दिनांक 7 मे 2026 अन्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 इतके अर्थसहाय्य थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.
या प्रक्रियेसाठी प्रत्येक लाभार्थ्याने Life Certificate सादर करून Beneficiary Satyapan App (BSA) मार्फत ऑनलाइन पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. पडताळणी न झाल्यास अर्थसहाय्य वितरणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने लाभार्थ्यांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, तहसीलदार चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सविता झाडे आणि ज्ञानेश्वर नागपुरे यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महसूल सहायक साईनाथ हामंद आणि संतोष माने यांनी मुलचेरा तालुक्यातील विविध आपले सरकार सेवा केंद्रांना भेटी देऊन सेवा केंद्र चालकांना व कर्मचाऱ्यांना BSA अॅपद्वारे ऑनलाइन पडताळणी प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून मार्गदर्शन केले.
यावेळी लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र कसे नोंदवायचे, आधार क्रमांक व बँक खाते संलग्नता तपासणी, लाभार्थ्यांची ओळख पडताळणी तसेच ऑनलाइन सत्यापनाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना तत्पर व अचूक सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तहसील प्रशासनाने तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, सेतू सुविधा केंद्र, महा ई-सेवा केंद्र आणि नागरिक सेवा केंद्रांनी लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश दिले आहेत. लाभार्थ्यांनी वेळेत पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यास शासनाचे अर्थसहाय्य कोणत्याही विलंबाशिवाय थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुलचेरा तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तातडीने Life Certificate आणि BSA पडताळणी पूर्ण करावी, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





