ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

गडचिरोली जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याचा डंका!

‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट, गोमनी’ प्रथम; ‘कोया पूनेम महिला शेतकरी गट, धन्नुर’ तृतीय

गडचिरोली : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत वर्चस्व सिद्ध केले आहे. या महोत्सवात मुलचेरा तालुक्यातील ‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट, गोमनी’ या गटाने प्रथम क्रमांक, तर ‘कोया पूनेम महिला शेतकरी गट, धन्नुर’ या महिला शेतकरी गटाने तृतीय क्रमांक पटकावला.

राज्याचे कृषी मंत्री मा. ना. ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दोन्ही विजेत्या गटांना पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातील विविध रानभाजी प्रदर्शन व विक्री गटांमधून मुलचेरा तालुक्यातील दोन गटांची झालेली ही निवड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित

रानभाज्यांचे औषधी व पौष्टिक महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे, स्थानिक नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व महिला बचत गटांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.

मुलचेरा तालुक्यातील शेतकरी गटांनी रानभाज्यांचे केलेले आकर्षक व शास्त्रोक्त सादरीकरण, त्यांचे पोषणमूल्य तसेच पारंपरिक ज्ञान यामुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

पारितोषिक वितरण प्रसंगी कृषी मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुलचेरा तालुक्यातील शेतकरी गटांच्या मेहनतीचे आणि रानभाज्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचे योगदान

या यशामागे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी श्री. विकास पाटील, उपकृषी अधिकारी श्री. मनोहर दुधबावरे, उपकृषी अधिकारी श्री. सेवकदास गरमाळे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. तिरुपती कौशल्य, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रोहित कोडापे तसेच बीटीएम, मुलचेरा श्री. आकाश लवटे यांचा विशेष सहभाग राहिला.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि शेतकरी गटांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मुलचेरा तालुक्याने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या शेतकरी गटांचे तसेच कृषी विभागाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.