‘सेवा संकल्प अभियान’ला १७ सप्टेंबरपासून सुरुवात

प्रत्येक गावात सेवा उपक्रम; युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार असून, नागरिकांनी विविध सामाजिक व जनसेवा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत प्रत्येक गाव व वॉर्डात सेवा योगदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढविण्यासोबतच शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचाही सहभाग घेण्यात येणार आहे.
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
‘सेवा योगदानासाठी’ स्थानिक गरजेनुसार विविध उपक्रमांची निवड करता येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, अनाथालय व वृद्धाश्रम भेट, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिर, योग व ध्यान सत्र, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, वंचित मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य, करिअर कौन्सिलिंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता यांचा समावेश आहे.
तसेच व्यसनमुक्त भारत जनजागृती, पोषण व ॲनिमिया जनजागृती, रस्ते सुरक्षा, जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा, फिट इंडिया खेळ सत्र, वीरगाथा व सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजनांसाठी सहाय्य उपक्रम, मतदार जनजागृती व नोंदणी, ‘व्होकल फॉर लोकल’ सहकार्य तसेच सरकारी योजनांची जनजागृती अशा उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.
स्वच्छतेनंतर स्थानिक समितीची स्थापना
अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांपुरते मर्यादित न राहता, भविष्यात नियमित स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. स्वच्छता उपक्रमानंतर संबंधित ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांकडून सामूहिक संकल्पही करण्यात येणार आहे.
ग्राम व शहरी भागासाठी नोडल अधिकारी
ग्रामीण भागातील कार्यक्रमांच्या आयोजनासाठी गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर शहरी भागात मुख्याधिकारी अथवा वॉर्ड अधिकारी यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.
‘जनतेची सेवा, हात आमचा संकल्प—समृद्ध महाराष्ट्र, समर्थ भारत!’ या भावनेतून नागरिकांनी ‘सेवा संकल्प अभियानात’ मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





