ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सिरोंचात पत्रकारांचे स्वच्छता अभियान; ‘लेखणी’सोबतच हातात घेतला ‘झाडू’*

• तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

• नगरम चौक परिसरात स्वच्छता करत नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश

सिरोंचा :

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. केवळ बातम्यांच्या माध्यमातूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली सिरोंचा येथील मुख्य ‘नगरम चौक’ परिसरात ही स्वच्छता मोहीम पार पडली.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त औपचारिक कार्यक्रमांऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. त्यानुसार सकाळीच सर्व पत्रकार बांधवांनी नगरम चौकात एकत्र येत हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा साफ केला. पत्रकारिता ही केवळ समाजातील समस्या मांडण्यापुरती मर्यादित नसून, सामाजिक परिवर्तनात प्रत्यक्ष सहभागी होणे हीदेखील काळाची गरज आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सागर मूलकला म्हणाले की, “आपले शहर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपंचायत किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.” पत्रकारांच्या या अनोख्या पुढाकाराचे चौकातील व्यापारी आणि नागरिकांनी कौतुक केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या स्वच्छता मोहिमेत तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोनी, सचिव अशोक कुम्मरी, ज्येष्ठ पत्रकार श्याम बेजानीवर, सुरेश त्रिपाठी, जाकीर अली, मुजफ्फर खान यांच्यासह तालुक्यातील इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

G K