ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा १२ नोव्हेंबरला भव्य मोर्चा; नुकसानभरपाईसह विविध मागण्यांसाठी एल्गार

भामरागड :-भामरागड तालुक्यात यंदा अनियमित पावसामुळे तसेच किडींच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाला तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

PWD रेस्ट हाऊसपासून मोर्चाला सुरुवात

गुरुवारी सकाळी ११ वाजता भामरागड येथील PWD रेस्ट हाऊसपासून या मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चाची सांगता तहसील कार्यालय, भामरागड येथे होणार आहे. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

या मोर्चाच्या माध्यमातून भामरागड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावेत, बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ निवारण योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच शेतीविषयक विविध समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

शेतकरी एकजुटीचे आवाहन

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शेतीच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी बांधव, शेतमजूर, युवक आणि नागरिकांनी आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि ऑल इंडिया किसान सभा (AIKS), गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवा,’ असा ठाम निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.