अहेरी, दि. ९ : खरीप हंगाम २०२६–२७ मध्ये शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अहेरी येथे सोमवारी दुपारी १२.०० वाजता ‘हल्लाबोल’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सीनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असून, शेतकऱ्यांना तात्काळ युरिया व डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
खतांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या गैरसोयीबाबत प्रशासनाला जाब विचारण्याबरोबरच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनादरम्यान “अंध झालेल्या शासन-प्रशासनाला चष्मा देऊन अंधारातून उजेडाकडे आणण्याचा” प्रतीकात्मक उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या आंदोलनासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, विद्यमान व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी सकाळी ११.०० वाजेपर्यंत भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे अहेरी तालुक्यातील खतपुरवठ्याच्या प्रश्नाकडे शासन व कृषी प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा शेतकरी व पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





