गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मुलचेरात भव्य कृषी मेळावा; शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन आणि विविध साहित्याचे वाटप

मुलचेरा, दि. ९ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या समाजाभिमुख ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत आणि ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’ योजनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशन मुलचेरा यांच्या वतीने गुरुवारी (दि. ९ जुलै) मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३.३० या वेळेत पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, शासकीय योजना, कृषी तंत्रज्ञान, बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खतांची माहिती देण्याबरोबरच विविध विभागांच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभही उपलब्ध करून देण्यात आला.

हा उपक्रम गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सत्यसाई कार्तिक तसेच अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा यांनी या मेळाव्याचे प्रभावी नियोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आत्मा विभागाचे कृषी सेवक आकाश लवटे, प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम लोहंबरे, पंचायत समिती मुलचेराचे कृषी विस्तार अधिकारी सारंग कन्नाके, तहसील कार्यालय मुलचेराचे पुरवठा निरीक्षक शरद रायसिडाम तसेच पोस्ट ऑफिस मुलचेराचे व्यवस्थापक मारोती सातपुते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, हवामानानुसार पीक नियोजन, शासकीय कृषी योजना तसेच विविध विभागांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती देत ग्रामीण भागातील नागरिकांना त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. कृषी, आरोग्य, पुरवठा, पोस्ट, आधार सेवा, पीएम किसान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांसह विविध विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत जागेवरच आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेक नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण झाली.

मेळाव्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी लिक्विड कन्सोशिया व ट्रायकोडर्मा या सेंद्रिय निविष्ठांचे १०० किट शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. तसेच पोषणबाग संकल्पनेला चालना मिळावी यासाठी भाजीपाला परसबाग मिनी किटचे १० संच देण्यात आले.

विविध शासकीय योजनांचाही मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २५ लाभार्थ्यांची नोंदणी व मार्गदर्शन, रेशन कार्डसंदर्भातील १५ लाभार्थ्यांना सेवा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत १५ शेतकऱ्यांना लाभ व मार्गदर्शन, ६० नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी, तसेच १५ नागरिकांची आधार कार्डविषयक कामे पूर्ण करण्यात आली.

या कृषी मेळाव्यास पोलीस स्टेशन मुलचेरा हद्दीतील सुमारे १७० ते २०० शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शासकीय विभाग एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन एका ठिकाणी मिळाले. त्यामुळे उपस्थित शेतकरी व नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष स्वागत केले.

पोलीस विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या विविध योजनांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली. पोलीस आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून लोकाभिमुख उपक्रम राबविल्यास शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात, याची प्रचिती या मेळाव्याच्या निमित्ताने आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहिते यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशन मुलचेरा येथील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.