ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर

● विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला भामरागड येथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणून उपचारासाठी दाखल
● सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर
गडचिरोली, दि. 31 जुलै : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना पूर आला असून भामरागड तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत लाहेरी येथील रहिवासी श्री. शामसुंदर नरोटी (वय 35 वर्षे) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती गंभीर झाल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले.
रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून गडचिरोली पोलीस दलाचे पवन हंस हेलिकॉप्टर तातडीने भामरागड येथे रवाना करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने श्री. नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी भामरागड परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयाशी किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क साधून वेळेत वैद्यकीय उपचार घ्यावेत.
ही संपूर्ण कार्यवाही गडचिरोली पोलीस दलाने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भामरागड, पोलीस स्टेशन भामरागडचे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट श्री. अरविंद सैनी आणि श्री. राजीव शर्मा यांनी मोलाचे सहकार्य केले.