गडचिरोली :
आगामी उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये आणि नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले होते.
तक्रारींची वाट पाहू नका!
दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यांतील संभाव्य टंचाईवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे. नागरिकांकडून पाणीटंचाईच्या तक्रारी येण्याची वाट न पाहता, आतापासूनच गावनिहाय आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात. त्यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
प्रलंबित कामांवरून कानउघाडणी
यापूर्वी मंजुरी देण्यात आलेली पाणीपुरवठा विषयक कामे अद्याप सुरू न झाल्याबद्दल आणि प्रलंबित असल्याबद्दल जिल्हाधिकारी पंडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही सर्व कामे युद्धपातळीवर सुरू करून विहित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
एप्रिलपासून टंचाईची शक्यता
सद्यस्थितीत जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाईची तक्रार नाही. मात्र, येत्या एप्रिल महिन्यापासून टंचाई भासण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी या बैठकीत वर्तवली. या पार्श्वभूमीवर विहिरींची स्वच्छता करणे, तसेच बोअरपंपांची देखभाल व दुरुस्ती यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांनाही सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.





