लभाण तांड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी; शेतकऱ्यांना कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

मुलचेरा, दि. 23 सप्टेंबर 2026 : अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मौजा लभाण तांडा येथे बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी केली.
यावेळी मा. तहसीलदार चेतन पाटील, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, नायब तहसीलदार गोरे, मंडळ कृषी अधिकारी गरमळे, कृषी पर्यवेक्षक दूधबावरे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पेंदाम, कुमरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि लभाण तांडा येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कापूस व भात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांवरील विविध कीड व रोगांचा आढावा घेतला. यावेळी पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
भात पिकावरील कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड व स्ट्रेप्टोसायजिनच्या वापराबाबत, तसेच तुडतुडा व इतर रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड, थायोमेथॉक्साम आदी कीटकनाशकांच्या फवारणीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांनी औषधांचा वापर करताना संबंधित पिकासाठी शिफारस केलेले प्रमाण व सुरक्षितता उपाय पाळण्याचे आवाहन केले.
याशिवाय महिला शेतकरी प्रमाणपत्र, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया व उपलब्ध लाभ याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
पीक परिस्थिती, कीड-रोग तसेच विविध कृषी योजनांशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पाहणीमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासह शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले.
या प्रत्यक्ष पाहणीसाठी लभाण तांडा येथील शेतकरी तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




