मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या दानपेटीतील रकमेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंदिर ट्रस्टच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाला आणखी वेग आला तो मंदिर विश्वस्त मंडळाच्या काही सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे. या पत्रात गेल्या काही काळात दानपेटीतील रक्कम वाढल्याचा उल्लेख करण्यात आला असून, यापूर्वी दानपेटीतील काही रक्कम लंपास होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे मंदिराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा दावा विश्वस्त मंडळातील काही सदस्यांनी केला आहे. विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी दर आठवड्याला दानपेटीतून जमा होणारी रक्कम तुलनेने कमी होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर दानपेटीतील उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली असून, यामागे व्यवस्थापनातील सुधारणा आणि पारदर्शक प्रक्रिया कारणीभूत आहेत. दानपेटीतील पैसे चोरीला गेल्याचा थेट उल्लेख पत्रात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदा सरवणकर यांच्या माहितीनुसार, काही कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, मंदिरातील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करून सत्य परिस्थिती समोर आणली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सिद्धिविनायक मंदिराच्या उत्पन्नातील वाढ, दानपेटीतील रक्कम आणि कर्मचाऱ्यांवरील कारवाई या सर्व मुद्द्यांवर आता चौकशीची मागणी होत आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





