अहेरी : विजयादशमीचा उत्साह आणि आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचा आनंद यंदा अहेरीकरांसाठी दुहेरी पर्वणी ठरणार आहे. येत्या २० ऑक्टोबर, मंगळवारी अहेरी येथील बाजारवाडीच्या भव्य मैदानावर रात्री ८ वाजता कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार असून, सुप्रसिद्ध कव्वाल डोंगरी का सुलतान अजीज नाझा आणि नामवंत कव्वाला गीता सिंग चिस्ती यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज हेही आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरीच्या राजवाड्यात उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी विजयादशमीच्या शुभपर्वावर धर्मराव बाबा आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने कव्वालीचे आयोजन केले जाते. यंदा विजयादशमी आणि आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात येत आहे.
कव्वालीच्या या शानदार मुकाबल्यात सुप्रसिद्ध कव्वाल डोंगरी का सुलतान अजीज नाझा आणि सुप्रसिद्ध कव्वाला गीता सिंग चिस्ती यांच्यात रंगतदार मुकाबला पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. बाजारवाडीच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अभिनेता चेतन हंसराज २० ऑक्टोबरला अहेरीत!
‘कूक डू कु’ चित्रपट आणि ‘महाभारत’ मालिकेतील भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते चेतन हंसराज हे २० ऑक्टोबर, मंगळवारी सकाळी ११ वाजता आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या भेटीसाठी अहेरी येथील राजवाड्यात येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येणार असून, या भेटीमुळे वाढदिवसाच्या उत्सवात आणखी आकर्षणाची भर पडणार आहे.





