गडचिरोली

अतिदुर्गम बोदली टोला गाव उजळले; १६ कुटुंबांच्या घरात पोहोचली वीज

गडचिरोली, दि. १८ नोव्हेंबर (जिमाका) : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम बोदली टोला गावातील १६ कुटुंबांच्या घरात वीज पोहोचली असून अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावाच्या विद्युतीकरणाला गती मिळाली असून महावितरणच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

 

बोदली टोला गावाच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा आदिवासी विकास उपयोजना सन २०२५-२६ अंतर्गत ३३ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून २.५० किलोमीटर उच्चदाब वाहिनी, १ किलोमीटर लघुदाब वाहिनी आणि ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले. महावितरणने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले.

 

यापूर्वी विजेअभावी ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजात तसेच मुलांच्या शिक्षणात विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आता घरगुती वीजपुरवठा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे सुलभ होणार असून शेतीशी संबंधित कामे आणि गावातील विकासात्मक उपक्रमांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

अतिदुर्गम भागातील मूलभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने बोदली टोला येथील विद्युतीकरण महत्त्वपूर्ण ठरले आहे. यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी दिली आहे.