पीक परिस्थितीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश; छायाचित्रे व जीपीएस लोकेशनसह अहवाल सादर होणार
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांत खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची मोठी तूट आणि इतर प्रतिकूल घटकांच्या आधारे शासनाने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी १२ महत्त्वाच्या सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दोन्ही तालुक्यांतील पीक परिस्थितीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी सर्वेक्षणादरम्यान पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे (Photos) व GPS ठिकाण (Location) संकलित करून विहित प्रपत्रात पीक परिस्थितीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मिळणाऱ्या प्रमुख सवलती:
* महसूल व कर्ज सवलत: जमीन महसुलात पूर्ण सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.
* शैक्षणिक व वीज सवलत: दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे, तसेच कृषी पंपांच्या वीजबिलात विशेष सवलत लागू करण्यात आली आहे.
* कृषी वीज जोडणी: शेतीपंपांची वीजजोडणी कोणत्याही परिस्थितीत खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पिण्याचे पाणी, रोजगार व चाऱ्याचे नियोजन:
दुष्काळाच्या तीव्रतेवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, अन्नधान्य व जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महसूल, कृषी व संबंधित विभागांनी पंचनामे आणि सर्वेक्षणाची कार्यवाही समन्वयाने पूर्ण करून या लागू सवलती पात्र शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी केली आहे. शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत विहित कार्यपद्धतीनुसार पंचनामे व सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे (GR) जाहीर करण्यात येणार आहे.





