
सिरोंचा : सिरोंचा शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक या प्रमुख मार्गाची अत्यंत खराब अवस्था झाल्याने नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार आणि इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेत रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजनही पार पडले होते. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष वाढत आहे. शहरातील हा मार्ग दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शाळा, बाजारपेठ, धार्मिक स्थळे आणि इतर कार्यालयांकडे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात याच रस्त्याचा वापर करतात. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे, मोठे खड्डे पडणे आणि चिखलामुळे वाहतूक धोकादायक बनली असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवकांनी संबंधित विभागाकडे रस्त्याचे काम रखडण्यामागील कारणे, मंजूर निधीची सद्यस्थिती आणि कामाच्या वेळापत्रकाची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली आहे. तसेच कायमस्वरूपी काम सुरू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून मुरूम, खडी व जीएसबी टाकून रस्ता सुरळीत करण्याची मागणीही त्यांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या सहभागातून लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते





