
मुलचेरा, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती वेळेवर, विश्वासार्ह आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डिजिटल कृषी सेवेचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. कृषी विभागाचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, रोग व किडींचे नियंत्रण, अनुदान, प्रशिक्षण तसेच कृषी विभागाच्या महत्त्वाच्या सूचना थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.

बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असताना वेळेवर मिळणारी माहिती हीच यशस्वी शेतीची गुरुकिल्ली ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलचा क्यूआर कोड लावण्यात आला असून, तो स्कॅन करून कोणताही शेतकरी काही सेकंदांत चॅनेलशी जोडला जाऊ शकतो. त्यानंतर विभागाकडून प्रसिद्ध होणारी प्रत्येक महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर पोहोचणार आहे. त्यामुळे कार्यालयात वारंवार येण्याची गरज कमी होऊन वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे.
या चॅनेलवरून पीकनिहाय सल्ला, हवामानाचा अंदाज, खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, शेतकरी मेळावे, प्रशिक्षण कार्यक्रम, अनुदान योजना, अर्ज प्रक्रियेची माहिती, शासनाचे नवीन निर्णय तसेच कृषी विभागाच्या तातडीच्या सूचना सातत्याने प्रसारित केल्या जाणार आहेत.
डिजिटल माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत अधिकृत माहिती एका क्लिकवर पोहोचविण्याची ही प्रभावी व्यवस्था असल्याने कृषी विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि वेग येणार आहे. चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीला आळा बसून शेतकऱ्यांना थेट अधिकृत माहिती मिळणार असल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.
हा अभिनव उपक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आला आहे. मुलचेरा तालुक्यात प्रथमच अशा स्वरूपाची डिजिटल सुविधा सुरू झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून, भविष्यात कृषी विभागाच्या अधिकाधिक सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.





