गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य

निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य

सिरोंचा (प्रतिनिधी) :

सिरोंचा शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व इम्तियाज खान यांनी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम, नालेसफाई आणि बंद पडलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ व कचरा साचल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. तसेच रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे, पालापाचोळा आणि साचलेला कचरा यामुळे अस्वच्छता वाढून डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या समस्यांचा गांभीर्याने विचार करून नगरपंचायत प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध नाल्यांमधील गाळ व कचरा काढणे, रस्त्यांच्या कडेला साचलेला पालापाचोळा व झुडपे हटविणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे तसेच बंद पडलेले स्ट्रीट लाईट दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

विशेषतः पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. स्वच्छता अभियानासोबतच सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य दिले जात आहे.

यावेळी नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व इम्तियाज खान यांनी नगरपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त करत शहरातील उर्वरित भागांमध्ये फॉगिंग आणि ब्लीचिंग पावडर फवारणीचे कामही तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण मिळण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कार्यरत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी भविष्यातही असेच समन्वयाने काम सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती मिळाली असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.