विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम; प्रत्येक मतदाराने सहकार्य करण्याचे आवाहन

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहीम राबविण्यात येत असून, मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरात जाऊन मतदारांकडून आवश्यक माहिती व कागदपत्रे संकलित करणार आहेत.
या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराने दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तयार ठेवावेत. BLO यांच्या भेटीदरम्यान दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून त्यावर स्वतःची स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा द्यावा. एक प्रत स्वतःकडे ठेवून दुसरी प्रत BLO यांच्याकडे जमा करावी.
40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांनी 2002 च्या मतदार यादीतील आपला अनुक्रमांक व भाग क्रमांक सांगणे आवश्यक आहे. तर 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मतदारांनी त्यांच्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांपैकी कोणाचाही 2002 च्या मतदार यादीतील क्रमांक उपलब्ध करून द्यावा. संबंधित माहिती BLO यांच्याकडे उपलब्ध असणार आहे.
तसेच, विवाहित महिलांनी माहेरच्या नोंदीतील माहितीची खात्री करून घ्यावी. बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांनी आपले पासपोर्ट आकाराचे फोटो गावातील नातेवाईकांकडे उपलब्ध करून ठेवावेत, जेणेकरून BLO यांच्या भेटीदरम्यान प्रक्रिया पूर्ण करता येईल.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, फॉर्म भरून न दिल्यास संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन BLO यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





