महिलांना दिवाळीची अनोखी भेट…राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते १०० महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप.
*महिला सक्षमीकरणाला बळ; अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजू महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी.*
*📍अहेरी:-* महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने दिवाळीचे औचित्य साधून अहेरी येथील माता कन्यका परमेश्वरी मंदिर सभागृहात मोफत शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम पार पडला. माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते अहेरी विधानसभा क्षेत्रातील १०० गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणात मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा या चार तालुक्यांतील १०० महिलांची निवड करून त्यांना शिलाई मशीन देण्यात आली. या माध्यमातून महिलांना घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करून स्वतःचे उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देण्याचा हा प्रयत्न आहे.
*महिला सक्षमीकरण ही काळाची गरज – राजे अम्ब्रिशराव आत्राम*
यावेळी मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविणे ही काळाची गरज आहे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता, कौशल्य आणि जिद्द असून त्यांना योग्य संधी व साधने उपलब्ध करून दिल्यास त्या स्वतःच्या कर्तृत्वावर आर्थिक परिस्थिती बदलू शकतात. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावावा. महिलांच्या हाताला काम मिळावे आणि प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी, हाच या उपक्रमामागील प्रामाणिक उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिलांनी स्वतः रोजगार निर्माण करण्यासोबतच इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय सुरू करू न शकणाऱ्या महिलांना मोठा आधार मिळणार असून त्यांच्या आयुष्यात स्वयंरोजगाराची नवी वाट खुली होणार आहे. महिलांना केवळ मदत न देता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधन उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न ठरत आहे.
कार्यक्रमाच्या मंचावर प्रशांत कुतरमारे, प्रकाश गुड्डेलीवार, भाजपा तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, संजीव सरकार, अर्जुन आलाम, विकास उईके, संतोष उरते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिनीताई पोहणेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दिवाळीच्या निमित्ताने १०० गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून महिलांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हीच या दिवाळी भेटीची खरी फलश्रुती ठरली आहे.






