गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; आरमोरीत तालुकास्तरीय प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; आरमोरीत तालुकास्तरीय प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ

आरमोरी : शालेय शिक्षण विभाग तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाला मंगळवारी यशवंत इंग्लिश स्कूल, आरमोरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. इयत्ता दुसरीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण १ ते ३ जुलैदरम्यान तीन दिवस, तर इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण १ ते ४ जुलैदरम्यान चार दिवस चालणार आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन किसनराव खोब्रागडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख संजय बीडवाईकर, केंद्रप्रमुख डॉ. विजय रामटेके, केंद्रप्रमुख सुनील मेश्राम, केंद्रप्रमुख किशोर मेश्राम तसेच केंद्रप्रमुख कैलास टेम्भूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. सचिन खोब्रागडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थीकेंद्रित, कृतीप्रधान आणि अनुभवाधारित अध्यापनावर भर देत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत शिक्षकांनी ज्ञानाबरोबरच कौशल्ये, मूल्ये, सर्जनशीलता आणि जीवनोपयोगी क्षमता विकसित करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षणात नवीन अभ्यासक्रमातील बदल, अध्यापन-अधिगम प्रक्रियेतील नावीन्यपूर्ण पद्धती, कृतीआधारित व अनुभवाधारित शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच मूल्यमापनाच्या नव्या संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी सुलभक सुरेश चौधरी, गुरुदेव किरणापुरे, गोपाल मेश्राम, जयपाल लिंगायत, देविदास गावडे, विजय कन्नाके, पुरंदर चौधरी, कल्पना आळे, सुषमा रामटेके, प्रतिक्षा कोडापे, रंजना वासाडे, कविता आंबोरकर, आंजिरा भलाई आणि नितुराणी मलाकार हे कार्यरत असून प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या प्रशिक्षणातून नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी राजेश वडपल्लीवार यांनी केले. सूत्रसंचालन सुनंदा गिरीपुंजे यांनी, तर आभार प्रदर्शन दीपाली गुडेपवार यांनी केले.