गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आलापल्ली–सिरोंचा मुख्य रस्त्याची दुर्दशा; चिखलामुळे वाहतूक विस्कळीत, नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप

आलापल्ली : आलापल्ली–सिरोंचा या महत्त्वाच्या मुख्य मार्गावरील टेकमपल्ली फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टेकमपल्ली फाट्यावरील संपूर्ण परिसर चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. रस्ता उखडल्याने अनेक वाहने चिखलात अडकत असून काही वाहनांना परत फिरावे लागत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या मार्गावरून अहेरी, सिरोंचा तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून चिखलातून मार्ग काढावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. एसटी बस, मालवाहतूक आणि खासगी वाहनांच्या वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम होत आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नागरिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, पुलाच्या बांधकामाला गती द्यावी तसेच सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात पावसामुळे संपूर्ण मार्ग बंद पडून जनजीवन आणखी विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.