
धानोरा तालुका प्रतिनिधी
शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे धानोरा वासियाना रस्त्यावरून चालणे आणि दुचाकी चारचाकी वाहने कठीण झाले होते, त्या समस्येचा खेळ अखेर नगरपंचायत प्रशासनाने एकाच झटक्यात खल्लास केला आहे. शहराच्या सौंदर्याला आणि सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या या विळख्यातून मुख्य बाजारपेठेला मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने शुक्रवारी अत्यंत धडक पाऊल उचलले. थेट रस्त्यावर उतरून ॲक्शन मोडमध्ये आलेल्या मुख्याधिकारी श्री प्रितीश मगरे यांच्या या धाडसी भूमिकेमुळे वर्षानुवर्षांपासून रखडलेला रस्ते रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
शुक्रवारी सकाळी ठीक नऊ वाजल्यापासून शहरात या हायव्होल्टेज मोहिमेला सुरुवात झाली. नगरपंचायतीचे विशेष पथक, जेसीबी, ट्रॅक्टर आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेत दाखल झाले. तहसीलदार गणेश माळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौक, बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय रस्ता आणि आठवडी बाजार परिसरातील रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत व्यवसाय, पत्र्यांचे शेड आणि दुकानदारांनी रस्त्यावरच केलेले पक्के बांधकाम कोणाचीही हयगय न करता जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपंचायतीचे बांधकाम विभागप्रमुख मंगेश नाकाडे, अभियंता वीणा सहारे, कर निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. या ऐतिहासिक कारवाईनंतर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा वाहतुकीचा त्रास दुर झाला आहे.आणि तो कायम स्वरुपी रहावा हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
अशाच पद्धतीने शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे.जेने करुण पुन्हा असे अतिक्रमण केले जाणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे.
”*ही कारवाई केवळ एकदिवसीय किंवा तात्पुरती मलमपट्टी नाही. धानोरा शहर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त ठेवणे ही आमची मुख्य प्राथमिकता आहे. आज ज्यांचे अतिक्रमण हटवले आहे, त्यांनी पुन्हा तिथे रस्ता अडवण्याचा किंवा व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील*.”
—श्री, प्रितीश मगरे (मुख्याधिकारी, धानोरा नगरपंचायत)





