वयोवृद्ध शेरेंगेबाई आजही जपत आहेत आदिवासी परंपरा; टोरीच्या बियांपासून घरगुती तेल तयार करण्याची अनोखी परंपरा जिवंत
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील देवदा या आदिवासीबहुल गावात आजही निसर्गाशी एकरूप झालेली पारंपरिक जीवनशैली पाहायला मिळते. आधुनिक युगात अनेक पारंपरिक प्रथा व ज्ञान हरवत असताना, वयोवृद्ध शेरेंगेबाई दुलसा तिम्मा या आपल्या पूर्वजांकडून मिळालेली आदिवासी परंपरा आजही तितक्याच जिद्दीने जपत आहेत.
हिरव्यागार जंगलात जाऊन झाडाखाली पडलेली टोरीची फळे त्या स्वतः वेचून टोपलीत भरून घरी आणतात. त्यानंतर ही फळे काही दिवस उन्हात चांगली वाळवली जातात. वाळल्यानंतर घरातील झोपडीत पारंपरिक पद्धतीने दगडाच्या साहाय्याने त्यांची कवच फोडून आतील गर किंवा बिया वेगळ्या केल्या जातात. या बियांपासून तयार होणारे तेल पूर्णपणे नैसर्गिक असून त्याचा उपयोग घरगुती स्वयंपाकासाठी केला जातो.
वयोमानाची नव्वदी ओलांडूनही शेरेंगेबाई हे श्रमाचे काम अत्यंत आनंदाने करतात. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि उत्साह पाहून आजच्या पिढीलाही प्रेरणा मिळते. त्यांच्या मते, टोरीच्या बियांपासून काढलेले नैसर्गिक तेल आरोग्यासाठी लाभदायक असून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात याच तेलाचा वापर होत असल्याचे त्या सांगतात.
एकीकडे बाजारातील प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलांचा वापर वाढत असताना, दुसरीकडे देवदा गावातील शेरेंगेबाईसारख्या ज्येष्ठ महिला निसर्गसंपत्तीचा योग्य वापर करून स्वावलंबी जीवन जगत आहेत. त्यांच्या या जीवनशैलीतून आदिवासी समाजाचे निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि पारंपरिक ज्ञानाची समृद्ध परंपरा स्पष्टपणे दिसून येते.
आजच्या नव्या पिढीने अशा पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे आणि त्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. शेरेंगेबाई दुलसा तिम्मा यांचे कार्य केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून आदिवासी संस्कृती, स्वावलंबन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि परंपरेप्रती असलेल्या निष्ठेतून अनेकांना प्रेरणा मिळत असून, अशा परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.





