सिरोंचा :ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सिरोंचा येथे सुरू करण्यात आलेल्या ‘स्नेहधर्म धर्मार्थ दवाखाना व डायलिसिस सेंटर’चा उद्घाटन सोहळा बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. “आर्थिक अडचणींमुळे किंवा अंतरामुळे कोणालाही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे प्रतिपादन डॉ. मिताली आत्राम यांनी यावेळी केले.
स्नेहादेवी राजे धर्मरावबाबा आत्राम बहुउद्देशीय संस्था, अहेरी यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन प्रांत सेवा प्रमुख सुनीलजी मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मिताली आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर कोल्लूरी, ओएसडी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच स्नेहधर्म रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
दुर्गम भागातील रुग्णांना दिलासा
सिरोंचा येथील दुर्धीवार बिल्डिंग, को-ऑपरेटिव्ह बँक आणि जॉन डिअर शोरूमजवळ हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. सिरोंचा व परिसरातील ग्रामीण आणि दुर्गम भागांतील रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागते. विशेषतः डायलिसिससारख्या नियमित उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना प्रवासाचा खर्च, वेळ आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत सिरोंचा येथे डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संबंधित रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
आरोग्यसेवेला मिळणार नवी दिशा
या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी आणि उपचारांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
स्नेहादेवी राजे धर्मरावबाबा आत्राम बहुउद्देशीय संस्थेच्या या उपक्रमामुळे सिरोंचा परिसरातील आरोग्यसेवेला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः डायलिसिसची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.





