राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज भव्य आरोग्य तपासणी व स्वेच्छा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या विशेष शिबिरादरम्यान एकूण १०२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच १५ नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानासाठी आपली नोंदणी केली.
आरोग्य तपासणीदरम्यान गरजू रुग्णांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५३ जणांची ईसीजी, ५८ जणांची रक्त तपासणी तर ४८ जणांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५ जणांना पूर्वीपासून उच्च रक्तदाब व ५ जणांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले, तर अनुक्रमे ८ आणि ४ नवीन संशयित रुग्ण आढळून आले. दोन व्यक्तींना हे दोन्ही आजार जुनेच असल्याचे तर इतर दोघांमध्ये या दोन्ही आजारांचा संशय आढळला. शिबिरात एका महिलेची स्तन कर्करोगविषयक विशेष तपासणीही करण्यात आली. तसेच ५ पात्र लाभार्थ्यांना तात्काळ ‘आयुष्मान भारत’ कार्डचे वितरण करण्यात आले.
रक्तदान शिबिरात ४९ पुरुष व एका महिलेसह एकूण ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तसेच समाजाप्रती सर्वोच्च कर्तव्य भावनेतून १५ जणांनी मरणोत्तर अवयवदानासाठी अर्ज सादर करत नोंदणी केली.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, उपजिल्हाधिकारी स्मिता मोरे व स्मिता बेलपत्रे, तहसीलदार संतोष आष्टीकर व संजय जयस्वाल यांच्यासह महसूल, आरोग्य आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





