होडरी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामसभांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन
भामरागड, २२ सप्टेंबर:
भामरागड तालुक्यातील गोपनार, हालोडंडी, मोराडपार, लष्कर, होडरी तसेच परिसरातील गावांमध्ये रस्ते, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, सिंचन, वनहक्क आणि ग्रामसभा सक्षमीकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या गंभीर प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कालबद्ध पद्धतीने (Time-bound) ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामसभांच्या वतीने गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने विभागनिहाय कृती आराखडा (Action Plan) तयार करावा, अशी मागणी होडरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांनी केली आहे.
भामरागड तालुका हा अतिदुर्गम आणि दीर्घकाळ नक्षलप्रभावित राहिल्याने येथील अनेक गावांमध्ये शासनाच्या मूलभूत सेवा व विकास योजनांचा अपेक्षित प्रमाणात लाभ पोहोचलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आजही शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पिण्याचे पाणी, सिंचन, कृषी सुविधा आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
बंद शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी:
तालुक्यात विविध कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दीर्घकाळापासून बंद आहेत. प्रशासनाने तातडीने गावनिहाय आढावा घेऊन या बंद शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गावाजवळच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षक, वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, शौचालय, वीज व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदनात प्रामुख्याने नमूद केले आहे.
रस्ते व पूल बांधकामाला प्राधान्य देण्याचे आवाहन:
गोपनार, हालोडंडी, मोराडपार, लष्कर, होडरी आणि परिसरातील गावांना तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच या मार्गावरील आवश्यक रस्ते, पूल व पुलियांची कामे प्राधान्याने मंजूर करावीत. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तालुका किंवा इतर मुख्य केंद्रांशी तुटू नये, यासाठी कायमस्वरूपी व दर्जेदार दळणवळण व्यवस्था उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




