Uncategorized

सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला मतदारसंघात शिवसेना बळकट करा ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांत शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद ऊर्फ संजू परब यांच्या पक्षविस्तारासाठी सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. आगामी ग्रामपंचायत तसेच अन्य निवडणुकांमध्ये पक्षाचा क्रमांक एक कायम राखण्यासाठी गावागावांत आणि घराघरांत शिवसेना पोहोचवण्याचे काम करावे, असे निर्देश सामंत यांनी दिले.

दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी तिन्ही प्रमुख नेत्यांनी परब यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा केली.

शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवा

शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संजू परब हे सातत्याने काम करत असून, ही कार्यपद्धती पुढेही कायम ठेवावी. आगामी ग्रामपंचायत आणि अन्य निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. गावागावांत आणि घराघरांत शिवसेना पोहोचवतानाच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांच्याशी शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यप्रणालीबाबत चर्चा केली. तसेच विकासकामे आणि सावंतवाडी शहरातील विविध कामकाजाच्या पद्धतींबाबतही माहिती जाणून घेतली.

पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत

संजू परब यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर त्यांनी तिन्ही वरिष्ठ नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. संजना परब, सभापती सुस्मिता जाधव, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, नगरसेविका स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवणे, आगामी निवडणुकांची तयारी आणि विकासकामे याबाबत चर्चा झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.