
मुलचेरा, दि. ९ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मुलचेरा तालुक्यातील सांस्कृतिक भवन परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.
कार्यक्रमाला नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करण्यात आले. तसेच आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी समाजाच्या हक्क, संस्कृती, परंपरा आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारा महत्त्वाचा दिवस आहे. मुलचेरातील कार्यक्रमातून आदिवासी एकतेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिल्याने सांस्कृतिक भवन परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.





