बोलेपल्ली येथील युवा शेतकरी संदीप मट्टामी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
मुलचेरा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीमालाची गुणवत्ता सुधारण्यासह योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुभगाँन शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, मुलचेरा यांच्या वतीने भेंडाळा येथे धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राचा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी बोलेपल्ली येथील युवा शेतकरी संदीप मट्टामी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला विभागीय नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) घारगाटे मॅडम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अर्चना कोचारे (नोडल अधिकारी, गडचिरोली – स्मार्ट प्रकल्प), उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिह्पुंजे, मुलचेरा तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, चामोर्शी तालुका कृषी अधिकारी तुमडम सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच सुभगाँन शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, मुलचेरा येथील संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादित धान्याची स्वच्छता, वर्गीकरण व गुणवत्तेनुसार प्रतवारी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषीमालाची गुणवत्ता वाढण्यास आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य मोबदला मिळवून देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमामुळे मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीमालाच्या विक्रीसाठी नवी संधी उपलब्ध होणार असून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेती व्यवसायाला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.





