गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पोलीस विभागाच्या पुढाकाराने भव्य कृषी मेळावा; शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभाग एकाच छताखाली

मुलचेरा, दि. ९ :

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशन, मुलचेरा यांच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी मेळाव्याला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून दिल्या.

मेळाव्यात कृषी, महसूल, आधार केंद्र, आरोग्य, पशुसंवर्धन, बँका, पंचायत राज व इतर शासकीय विभागांनी स्वतंत्र माहिती कक्ष उभारले होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व लाभ मिळविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक विभागांनी ऑन-द-स्पॉट सेवा शिबिरेही आयोजित केली.

यावेळी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून आधुनिक शेती, शासनाच्या योजना आणि नागरिक-प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर दिला. कृषी विभागाने आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण, कृषी अनुदान योजना तसेच अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलची माहिती दिली.

मेळाव्यास तालुक्यातील विविध गावांतील शेकडो शेतकरी, महिला व नागरिक उपस्थित होते. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीस विभागाच्या पुढाकारातून आयोजित हा कृषी मेळावा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी माहिती, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारा प्रभावी उपक्रम ठरला.