गडचिरोली ताज्या घडामोडी

मद्दीगुडममध्ये बतुकम्माचा जल्लोष; रविवारी ‘सद्दुला बतुकम्मा’ रंगीबेरंगी फुलांची आरास; पारंपरिक गीतांवर महिला-तरुणींचा ठेका

अहेरी :तेलंगणा राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या ‘बतुकम्मा’ उत्सवाला १० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, १८ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या नऊ दिवसीय उत्सवाचा अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील महिला, तरुणी आणि नागरिक उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असून, संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

उत्सवानिमित्त गावात आकर्षक मंडप उभारून रंगीबेरंगी दिव्यांनी सजावट करण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांनी सजविलेली बतुकम्मा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. काही महिला बाजारातून विविध प्रकारची फुले खरेदी करतात, तर काही महिला गाव परिसरातील झाडांवरून रानफुले गोळा करतात. या फुलांची आकर्षक आरास करून पारंपरिक पद्धतीने बतुकम्मा सजविली जाते.

सायंकाळी महिला व तरुणी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येतात. सजविलेल्या बतुकम्माभोवती गोलाकार उभे राहून पारंपरिक गीते गातात आणि तालबद्ध नृत्य करतात. फुलांची रंगीबेरंगी सजावट, गीतांचा गजर आणि महिलांचा सामूहिक सहभाग यामुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे.

*रविवारी ‘सद्दुला बतुकम्मा’ने सांगता*
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी ‘सद्दुला बतुकम्मा’ने होणार आहे. यानिमित्त महिला पारंपरिक गीते गात आणि तालबद्ध नृत्य करीत उत्सव साजरा करतील. विशेष नैवेद्य अर्पण केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने बतुकम्माचे विसर्जन करण्यात येणार आहे.

*निसर्गपूजा आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम*
बतुकम्मा हा केवळ फुलांचा उत्सव नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि महिलांच्या सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविणारा सण आहे. पावसाळ्यानंतर बहरणाऱ्या फुलांची आरास करून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पारंपरिक गीते, नृत्य आणि सामूहिक सहभागातून महिलांमधील एकोपा, भगिनीभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो. तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या अहेरी तालुक्यातील मद्दीगुडममध्ये हा उत्सव स्थानिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.