सिरोंचा:
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीची आणि वहिवाटीची अडचण दूर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय सिरोंचा आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. तालुक्यातील जानमपल्ली या गावामध्ये पांदण रस्त्यांच्या मोजणीच्या आणि मार्किंगच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, प्रशासनाच्या या गतिमान भूमिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पांदण रस्त्यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून शेतात ये-जा करताना आणि पावसाळ्यात शेतमाल बाजारात आणताना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांची हीच वर्षानुवर्षांची गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी आणि तिचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी प्रशासनाने थेट बांधावर जाऊन काम सुरू केले आहे.
अतिशय अचूक आणि उत्कृष्ट पद्धतीने पॉईंट्स निश्चित
जानमपल्ली येथील पांदण रस्त्याचे काम कायदेशीर आणि अचूक पद्धतीने व्हावे, यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे उत्कृष्ट भूकरमापक (सर्वेअर) आर. एस. सिडाम यांनी तंत्रज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून रस्त्याचे पॉईंट्स घेण्याचे काम अत्यंत चोखपणे पार पाडले. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि रस्ताही सुटसुटीत होईल, अशा पद्धतीने त्यांनी मोजणीचे उत्कृष्ट नियोजन केले.
महसूल विभाग आणि ग्राम प्रशासनाचे उत्तम समन्वय
हे मोजणीचे काम शांततेत आणि गतीने पूर्ण होण्यामागे महसूल व ग्राम प्रशासनाचा मोठा वाटा राहिला. जानमपल्ली येथील स्थानिक पटवारी (तलाठी) आणि कोतवाल यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून भूकरमापक सिडाम सरांना पांदण रस्त्याची जुनी वहिवाट आणि हद्दी दाखवून मोलाचे सहकार्य केले. या तिन्ही विभागांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे मोजणीची प्रक्रिया विनाअडथळा आणि यशस्वीपणे पार पडली.
शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार; सिरोंचात पांदण रस्त्यांची मोहीम तीव्र
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सिरोंचा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रशासन आता पूर्ण ताकदीने कामाला लागले आहे. जानमपल्ली येथील या यशस्वी मोहिमेनंतर तालुक्यातील इतर गावांमध्येही पांदण रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पांदण रस्ते मोकळे झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळेची आणि पैशांची बचत होणार असून, शेती कामांना मोठी गती मिळणार आहे. प्रशासनाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जानमपल्ली येथील समस्त शेतकरी बांधवांनी भूकरमापक आर. एस. सिडाम, पटवारी, कोतवाल आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे विशेष आभार मानले आहेत.






